मुंबई : ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.