वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश

 राजाभाऊ चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे शहरातील वंचित आघाडीला रिपाइं एकतावादीने सुरुंग लावला आहे. वंचित आघाडीशी संलग्न असलेल्या शेकडो गटई कामगारांसह अनेक कार्यकर्त्यांनी राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश केला. रिपाइं एकतावादीचे युवाध्यक्ष मा. स्थायी समिती सभापती भैय्यासाहेब इंदिसे यांनी या सर्वांचे पक्षामध्ये स्वागत केले.
वंचित आघाडीच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या आणि पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात येत होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. त्यातच आंबेडकरी समाजाच्या प्रश्नांची आक्रमकपणे मांडणी करणारे आणि गटई कामगारांच्या प्रश्नांवर लढणारे राजाभाऊ चव्हाण हे वंचितच्या या भूमिकेमुळे नाराज झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राजाभाऊ चव्हाण यांना स्वतंत्र पर्याय निवडण्याचे आवाहन केले होते. परिणामी, राजाभाऊ चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 12) भैय्यासाहेब इंदिसे यांची भेट घेऊन रिपाइं एकतावादीमध्ये आपल्या 250 कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. राजाभाऊ चव्हाण यांची रिपाइं एकतावादीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तमराव खडसे यांच्या हस्ते राजाभाऊ चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी, भैय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितले की, ठाणे शहरात राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गटई स्टॉलवर काही समाजकंटकांमुळे कारवाई करण्याचे धोरण ठाणे पालिकेने आखले आहे. ठाणे पालिकेने जर या गोरगरीबांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केला. तर, रिपाइं एकतावादी हे कदापी सहन करणार नाही. त्या विरोधात ठाणे शहरात जनआंदोलन उभारण्यात येईल. यासंदर्भात आपण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेणार असून गटई कामगारांना बेरोजगार होऊ देणार नाही.