मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरातील खाडी नंबर 3 येथील एका प्लास्टिक गोदामाला लागलेली भीषण आग दोन तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या 9 गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गोदामाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीत ही आग पसरल्याने सात ते आठ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
मुंबईत आज सकाळी 8 च्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील साकीनाका परिसरातील खाडी नंबर 3, सर्वोदय हॉस्पिटल जवळील गोदामाला भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या अग्निशमन दलाच्या 9 गाड्या, 6 जम्बो वॉटर टँकर, 1 वॉटर टँकर, 1 रेस्क्यू वाहन, 1 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. ही आग लेव्हल 2 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका येथे लागलेली ही आग प्रथम एक प्लास्टिकच्या गोदामला लागली होती. त्यानंतर ही आग आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये पसरली. या आगीमुळे आतापर्यंत सात ते आठ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. पण या ठिकाणी असणाऱ्या गल्ल्या या अतिशय अरुंद असल्याने आगीपर्यंत पोहोचण्यास अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली आहे.
आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी सुदैवाने समोर आलेली नाही. मात्र आगीत झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.