मुंबई: मुंबईतही कोरोनाची लस दाखल झाली असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यावर समाधान व्यक्त केलं आहे. कलियुगातील संजीवनी मुंबईत आली आहे. आता घाबरून जायचं कारण नाही. काळजी करू नका, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मुंबईत सीरमची लस आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही9 मराठीकडे सर्वात आधी प्रतिक्रिया व्यक्त केली. आता घाबरू नका. काळजी करण्याचं काम नाही. मुंबईत कलियुगातील संजीवनी आली आहे. त्यामुळे कोरोनाचा खात्मा होणार असून मुंबईकरांना मोठी संजीवनी मिळणार आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं. मुंबईत एकूण 1,39,500 लस आल्या आहेत. मुंबईत एकूण 1 लाख 30 हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली आहे. मुंबईत 9 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने आधीपासूनच तयारी केली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.