उदय सामंत म्हणाले की, राज्यपालांनी मनसे अध्यक्षांना पवार साहेबांना का भेटायला सांगितलं? हे त्यांनाच माहीत. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हेदेखील मला माहीत नाही, त्यावर बोलणं योग्य नाही. त्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आपण अर्थ लावू तसे वेगवेगळे अर्थ लागू शकतात. पण महाराष्ट्राला माहीत आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांची आघाडी आहे. त्यामुळे शरद पवार, सोनिया गांधी आणि राहूल गांधी या सर्वांशी चर्चा करून उद्धव ठाकरे सरकार चालवतात, हे सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि हे सर्वांना मान्य आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटावे, असा सल्ला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज ठाकरे यांना दिल्यानंतर शिवसेनेने या प्रकरणात सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज्यपालांनी राज ठाकरे यांना शरद पवारांना भेटायला सांगितले याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार शरद पवार चालवतात असा घेवू नये, असे मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री तसेच शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
वाढीव वीज बिलांसदर्भात सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेने उत्तर दिलं आहे. प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी शिवसेना बांधील नाही, असं सष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. अशा टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही, मुख्यमंत्रीदेखील त्याकडे लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे सुरु असल्याचे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. वाढीव वीज बिलांसंदर्भात सरकार संवेदनशील आहे, त्यासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे संकेत उदय सामंत यांनी दिले आहेत.