कल्याण-डोंबिवलीकरांसाठी 700 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल; खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती

येथील आर्ट गॅलरीमध्ये सुरु होणारे कोविड रुग्णालय हे तात्पुरत्या स्वरुपात न ठेवता कायम स्वरुपी रुग्णालय करण्यात येईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.






कल्याण : येथील आर्ट गॅलरीमध्ये सुरु होणारे कोविड रुग्णालय हे तात्पुरत्या स्वरुपात न ठेवता कायम स्वरुपी रुग्णालय करण्यात येईल, यासंबंधी विचार सुरु आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. (A 700-bed hospital will be set up for Kalyan-Dombivalikars : Shrikant Shinde)


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेची दोन रुग्णालये आहेत. कल्याणमध्ये रुक्मीणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालये आहेत. या दोन्ही रुग्णालयात आरोग्य सुविधा व स्टाफ अपूरा होता. त्यामुळे कोरोना काळात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून कोविड रुग्णालये सुरु करण्यात आली.



कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. मात्र कल्याण डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के झाले आहे. कोविड रुग्णालये सुरु करताना कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीमध्ये 700 बेडचे अत्याधुनिक आरोग्य सेवा देणारे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.


कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना या रुग्णालयाचा कायमस्वरुपी फायदा व्हावा, यासाठी हे तात्पुरते कोविड रुग्णालय कायमस्वरुपी रुग्णालय व्हावे यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी प्रक्रिया सुरु केली आहे..


यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, “आर्ट गॅलरीसाठी असलेले आरक्षण बदलून ते रुग्णालयासाठी करण्यात यावे यासाठी मी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे”. दरम्यान, नागरीकांसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.