मुंबई : “मुंबईत महाराष्ट्रात जो कोणी मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवण्यात येईल,” असा धमकीवजा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. बिग बॉसमधील (Bigg Boss) स्पर्धकजान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारला होता. त्याप्रकरणी अमेय खोपकरांनी हा इशारा दिला.
“कुमार सानू हे ज्येष्ठ गायक, संगीतकार आहे. त्यांचा मी नक्की आदर करतो. पण ते गाणं शिकता शिकता मुलावर संस्कार करायला विसरले,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“पण कुमार सानू यांचा मुलगा याचं काय करायचं, याला कशी मराठीची चिड येते, ते त्याला नक्की दाखवू. पण जर 24 तासाच्या आत बिग बॉसने किंवा कलर्सने माफी मागितली नाही, तर बिग बॉसचं गोरेगावमधील शूटींग होऊ देणार नाही, याला धमकी किंवा इशारा काय समजायचे ते समजा. पण त्या सेटचं काय होईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यायची,” असेही अमेय खोपकर म्हणाले.
“मुंबईत राहून मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. तुमच्या टीआरपीसाठी मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. मला पत्र लिहून माफी न मागता बिग बॉसच्या शोमध्ये माफी मागा तर मुंबईत बिग बॉसचे शूटींग होणार नाही,” असेही अमेय खोपकरांनी सांगितले.
बिग-बॉसमध्ये नेमकं काय घडलं?
बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे.
राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.