ठाणे (प्रतिनिधी)- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, ‘’मी प्रथम भारतीय आणि अंतिमत: भारतीय आहे”, असे म्हटले होते. देशहितासाठी त्यांनी कोणतीही तडजोेड केली नव्हती. त्यांचे हे वाक्य खरे ठेवण्याची जबाबदारी आंबेडकरी समुदायाची आहे. कोरोनाच्या काळात आपण देशहिताला प्राधान्य देऊन चैत्यभूमी किंवा शहराच्या मध्यवर्ती भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ न जमा होता; घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करु या, असे आवाहन रिपाइं एकतावादीचे नेते नानासाहेब इंदिसे यांनी केले आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी देशभरातून आंबेकडरी अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर तसेच आपल्या शहरातील पुतळ्याजवळ गर्दी करुन अभिवादनासाठी येत असतात. यंदा कोरोनामुळे अशी गर्दी जमा झाली तर त्यातून कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नानासाहेब इंदिसे यांनी हे आवाहन केले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीसारख्या राज्यात तर त्याची सुरुवातही झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये विशेष काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात कोरोनावर काही अंशी नियंत्रण प्रस्थापित करण्यात यश आले आहे. मात्र, जर, आपण सर्वांनी चैत्यभूमी किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात एकत्र येऊन गर्दी केली. अन् त्यानंतर जर कोरोनाचा संसर्ग वाढला तर त्याचे खापर आंबेडकरी समुदायावर फोडण्यासाठी काही प्रतिगामी शक्ती सज्ज आहेत. अनेकांनी मंदिरे उघडली आहेत. त्यामुळे चैत्यभूमीवर जायला बंदी का घालता, असा सवाल केला आहे. मात्र, असा सवाल करणारे लोक केवळ राजकारणाच्या अंगाने बघत आहेत. आपल्या समाजबांधवांसह देशवासियांची कोरोनापासूनची सुरक्षितता अबाधित ठेवायची असेल तर आपणाला घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन केले पाहिजे. बाबासाहेब हे आपल्या हृदयात आहेत; आपण सर्व पुरोगामी आणि विज्ञानवादी आहोत; त्यामुळे चैत्यभूमीला किंवा विभागातील मुख्य पुतळ्यासमोर जाऊन नतमस्तक होण्यापेक्षा आपण घरातच बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली. तर, कदाचित ते अधिक देशहिताचे असेल, असेही नानासाहेब इंदिसे यांनी म्हटले आहे.