ठाणे (प्रतिनिधी)- लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रकार शीळ डायघर येथे समोर आला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा- मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान आणि शानू पठाण यांनी समाजकंटकांचा डाव उधळून लावत अन्यायग्रस्त गाळे धारकाला त्याची वास्तू परत मिळवून दिली.
लॉकडाऊनच्या काळात मुझ्झफ्फर खान हे आपल्या गावी गेले होते. त्याचा फायदा घेऊन दिगंबर अंबेकर, भानू अंबेकर व इतरांनी खान यांच्या गाळ्याचा ताबा घेतला होता. गाळेधारकाला धमकावले, धक्काबुक्की केली व पुन्हा आल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सहारा ठाणे स्क्रँप असोसिएशनने खान यांचे वतीने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर डॉ. आव्हाड यांनी परिमंडळ एक चे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याशी संपर्क साधला होता. असोसिएशनचे अध्यक्ष अनीस कुरैशी व शीळ डायघर विभागाचे अध्यक्ष करीम खान यांनी याप्रकरणी आवाज उठवला होता. याप्रकरणी असोसिएशनच्या पदाधिकार्यांसहित गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा अध्यक्ष शमीम खान, नगरसेवक शानु पठाण, हिरा पाटील, नगरसेवक व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबाजी पाटील, हिरा पाटील, मुफ्ती अश्रफ, रफिक खान, मेहफूज मामा आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुलभा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी गाळेधारकाला न्याय मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.