ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा

 

ठाणे : दाट लोकवस्तीत राहाणाऱ्या महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांत सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करणे अत्यंत अवघड होत असते. या गोष्टीचा विचार करून ठाण्यातील ‘म्युज फाउंडेशन’ आणि ठाणे महापालिका यांनी एकत्रित येऊन शहरातील लोकमान्य नगर परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहात मासिक पाळीची खोली सुरू केली आहे. सॅनिटरी पॅडचा निचरा होण्यासाठी कचरापेटी, आरसा, पाण्याची सुविधा, बाथरूम अशा सुसज्ज खोलीची रचना लोकवस्तीतील महिलांच्या गरजा ओळखून करण्यात आली आहे.

ठाणे शहरात नागरिकांसाठी महापालिकेची सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत. या सार्वजनिक प्रसाधनगृहांची अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सुविधांमुळे महिलांना त्याचा वापर करणे अवघड असते. विशेषकरून मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. म्युज फाउंडेशनने या गोष्टीचा विचार करून ठाण्यातील शाश्वत मासिक पाळीच्या उपक्रमांतर्गत 2019 मध्ये आझादनगर, गणेशनगर, मानपाडा, रामचंद्रनगर, शास्त्रीनगर, मनीषानगर, रामबाग, शिवाजीनगर, गांधीनगर अशा शहरातील 15 लोकवस्तींमधील एकूण 1 हजार महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून असे समोर आले की, 67 टक्के नागरिकांच्या घरात प्रसाधनगृहांची सुविधा नाही. त्यामुळे या लोकवस्तीतील महिलांना मासिक पाळीच्या दिवसांतही सार्वजनिक प्रसाधनगृहांवर अवलंबून राहावे लागते. तिथे अस्वच्छता, दुर्गंधी, पाण्याचा तसेच कचरा व्यवस्थापनेचा अभाव अशा समस्यांना येथील महिलांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून म्युज फाऊंडेशनने या संदर्भात महापालिकेसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये ‘मासिक पाळीची खोली’ ही संकल्पना पुढे आली. सामान्य महिलेचा विचार करून आणि सर्व सुखसुविधांनी उपयुक्त अशी ही खोली एका खासगी कंपनीने बनविली आहे. सध्या ही खोली प्रायोगिक तत्त्वावर एका परिसरात सुरू करण्यात आली आहे.