ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर, आंबेडकरी नेत्यांमधील वाद कायम; आठवले म्हणाले…

अहमदनगर : “मी म्हणालो होतो की रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य होणार असेल तर मी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मात्र, आता आंबेडकरांचा 

रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. आता ऐक्य शक्य नाही,” असे मोठे विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ते अहमदनगर येथे बोलत होते. तसेच, मी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांना एनडीएमध्ये या असं म्हणालो होतो. मात्र, एनडीएमध्ये त्यांची आवश्यकता नाही अशी खोचक टिप्पणी करत त्यांच्या मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजाला फायदा होणार नसल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. 

आता ऐक्य शक्य नाही?

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात लढण्यास तयार असल्याचे यापूर्वी अनेकदा सांगितलेले आहे. आंबेडकर नेतृत्व स्वीकारत असतील तर हरकत नसल्याचेही ते यापूर्वी म्हणाले होते. मात्र, आता रामदास आठवले यांनी आपला पवित्रा बदलला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली असून त्यांचा रिपब्लिकन पक्षाशी संबंध राहीला नसल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. “रिपब्लिकन पक्षात ऐक्य होत असेल तर मी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करेल असे मी म्हणालो होतो. मात्र आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी संबंध राहिला नाही कारण त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. आता ऐक्य शक्य नाही” असे आठवले म्हणाले.

आंबेडकरांनी मतं मिळवली पण

आठवलेंनी यावेळी प्रकाश आंबेडकरांशी ऐक्य होणे शक्य नसल्याचे यावेळी सांगितले. तसेच, प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजाला फायदा होणार नसल्याचे म्हणत त्यांनी आंबेडकरांवर टीका केली आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतःच्या बळावर चांगली मतं घेतली. मात्र त्यांचा एकही खासदार किंवा आमदार निवडून आला नाही. त्यांच्या मतं खाण्याच्या राजकारणामुळे समाजला फायदा होणार नाही,” अशी टीका आठवलेंनी केली. तसेच, आंबेडकरांनी कोणत्या तरी पक्षासोबत जाण गरजेचं असल्याचा सल्लाही त्यांनी आंबेडकरांना दिला.