उत्सवांमध्ये मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नाही
मुंबई
करोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून मंडळांनी निर्णय मान्य करणार असल्याचं सांगितलं आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आगामी गणेशोत्सवातील कायदा, सुव्यवस्था संदर्भात व्हिसीद्वारे आढावा बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराजे देसाई तसंच राज्यातील गणेश मंडळाचे व मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. “आपण राज्यात पुनःश्च हरि ओम करून प्रत्येक पाऊल सावधतेने टाकत आहोत. परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावे लागेल. जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू, यासाठी कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितंल. “गणेश मंडळांच्या मार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.