ठाणे महापालिकेची उपाययोजना केवळ कागदोपत्रीच
ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल दररोज अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना तसेच आदेश देत आहेत. पालकमंत्री वारंवार बैठका घेऊन निरनिराळ्या उपाययोजनांची माहिती घेत आहेत. निधीची कमतरता पडू नये म्हणून राज्य सरकारकडून अधिक निधी घेण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीतील मोठा गोंधळ होत असल्याने रुग्ण, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना दाद कोठे मागायची असा प्रश्न पडला आहे. करोनाबाधित रुग्ण आढळून येताच अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २० जणांना विलगीकरण कक्षात ठेवले जावे तसेच घरोघरी जाऊन तपासणी करून त्यात ताप असलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवावे अशा सूचना यापूर्वीच आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. मात्र यावर कोणत्याही प्रकारची ठोस अंमलबजावणी अथवा कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेचा काऱ्यभार रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे. गोकुळनगर येथे घडलेल्या प्रकरणाने ठाणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.