कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला जिल्हा प्रशासनाचा आढावा
ठाणे
कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा. असे आवाहन करून ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. ही आशादायी बाब असून कोरोना या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने व समन्वयाने कामकाज करत आहेत ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. ठाणे पोलीस आयुक्तालयात कोरोनाच्या अनुषंगाने आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) डॉ.शिवाजी राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आदि उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी जिल्हाची कोरोना परिस्थिती, परराज्यातील मजुरांचा प्रश्न, पोलिसांमधील वाढते कोरोना रुग्ण यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, कायदा व सुव्यवस्थेचे आढावा घेतला.
केद्र शासनाने ठाणे जिल्हाचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती घेतल्या नंतर श्री. देशमुख म्हणाले, आपल्याला सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे. यामध्ये गर्दी टाळणे,संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपालन करणे गरजेचे आहे. गरजू व रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना अन्न धान्य मदत उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात अशी सूचना त्यांनी केली.