गावी जाण्यासाठी मजुरांची ठाणेसह कल्याणकडे धाव
ठाणे
लॉकडाउनमळे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय पायी ठाणेसह कल्याणकडे धाव घेऊ लागले आहेत. त्या ठिकाणावरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वे सुटत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पायपीट सुरू केली आहे. परराज्यातील व्यक्तींना मूळगावी जाण्याला शासनाकडून सवलत मिळाली आहे; परंतु रेल्वेवर अवलंबून असलेल्या बहुतांश परप्रांतीयांना अद्याप प्रवासाचा पास मिळालेला नाही. अशा व्यक्तींकडून जिथून रेल्वे सुटत आहेत, अशा ठिकाणांकडे धाव घेतली जात आहे.
त्यामध्ये ठाणे, कल्याण तसेच पनवेल स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकातून काही करून रेल्वे पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने मुंबईच्या अनेक भागातील परप्रांतीय नवी मंबईत प्रवेश करत असून रेल्वे रुळावरून अथवा रस्त्याने पायी प्रवासाचा टप्पा गाठत आहेत. तर ठाणे व कल्याणच्या दिशेने जाण्यासाठीदेखील नवी मुंबईतील मार्गाचा वापर होत आहे. अशाच प्रवासादरम्यान तुर्भे स्थानकाच्या आवारात विश्रांतीसाठी थांबणाऱ्यांचे घोळके जमत आहेत. खासगी वाहनाने गाव गाठण्याची ऐपत नसल्याने ते रेल्वेवर अवलंबून आहेत; परंतु त्यांच्या प्रवासाचा मार्ग खुलत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत जिथून रेल्वे सुटतात तिथून त्या पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नवी मुंबईत नाकाबंदीच्या ठिकाणी त्यांना अडवले जात आहे. त्यानंतरही दुसऱ्या मार्गाचा वापर करून रेल्वेस्थानक गाठण्याचा त्यांचा प्रयत्न सुरुच आहे.