करोनाच्या काळातही आयुक्तांच्या बंगल्याकरिता 50 लाखाचा खर्च 

करोनाच्या काळातही आयुक्तांच्या बंगल्याकरिता 50 लाखाचा खर्च 



ठाणे :  
ठाणेकरांवर दिवसेंदिँवस कोरोनाचे संकट वाढत असतानाच ठामपा आयुक्तांच्या बंगल्याचे नुतनीकरण करण्याचा घाट अभियंता विभागाने घातला आहे. विजय सिंघल यांना ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू होऊन महिना उलटत नाही तोच अभियंता विभागाने त्यांच्या निवासासाठी राखीव असलेल्या आयुक्त बंगल्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या काळातही 50 लाख रुपये खर्च करून सिंघल यांच्यासाठी नवा कोरा चकचकीत बंगला तयार केला जाणार आहे. यामुळे ठाणेकर आश्चर्य व्यक्त करत आहेत.  
महापालिका आयुक्तांच्या निवासासाठी पातलीपाडा परिसरात बंगला आहे. मध्यंतरी या बंगल्यातील दुरुस्ती कामांवर झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चाचा मुद्दा सर्वसाधारण सभेत बराच गाजला होता.माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या काळात या बंगल्यात काही अंतर्गत बदल करण्यात आले होते. तसेच याच परिसरात उद्यान आणि आनुषंगिक कामावरही बराच खर्च करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. जयस्वाल यांच्या काळात या बंगल्याच्या दुरुस्तीवर तसेच अंतर्गत कामांवर अनेकदा खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. असे असताना त्या वेळी गळती तसेच इतर कामे करण्यात आली नव्हती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  
विजय सिंघल यांची आयुक्त पदावर नियुक्ती होऊन काही महिने झाले असतानाच त्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या संदर्भात महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने आयुक्त बंगल्याचे नूतनीकरण आणि दुरुस्ती करणे या कामाची निविदा नुकतीच काढली असून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये बंगल्यातील दुरुस्ती कामे, वॉटर प्रूफिंग तसेच अन्य कामे करण्यात येणार आहेत. या सर्वच कामांसाठी 49 लाख 83 हजार 40 रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून येत्या 8 मेपर्यंत ही निविदा स्वीकारली जाणार आहे. याशिवाय बंगल्यातील नेमक्या कोणत्या भागात गळती होते आहे, दुरुस्तीची आणखी कोणती कामे केली जाणार आहेत, याविषयी शहर अभियंता रवींद्र खडताळे यांच्याकडे विचारणा केली असता आपण कामात व्यग्र आहोत, असे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच अधिक माहितीसाठी आयुक्तांचे स्वीय साहाय्यक महेश राजदेरकर यांच्याकडे विचारणा करा, असे सांगून त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली.