एपीएमसीतील फळबाजार सुरू, किरकोळ ग्राहकांना प्रवेशबंदी
नवी मुंबई
करोना संसर्गाच्या भीतीपोटी बंद करण्यात आलेले एपीएमसीतील बाजार आता सुरू झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून शासनाने हे बाजार सुरू करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी फळबाजारही सुरू झाला असून गर्दी कमी राहण्यासाठी या ठिकाणी किरकोळ ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. रमजान ईदनिमित्ताने बाजारात कलिंगड, खरबूज, पपई या रसाळ फळांना अधिक मागणी असते. या महिन्यात या फळांची आवक मोठय़ा प्रमाणात होत असते. त्यामुळे बाजार आवारात सामाजिक अंतर ठेवण्यासाठी तुर्भेतील एसटीच्या मोकळ्या जागेवर या व्यापाऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी कलिंगड व खरबूज यांच्या ५० गाडय़ा आवक करता येईल याचे नियोजन केले असल्याचे एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, कांदाबटाटा, अन्नधान्य बाजार नियमावलीनुसार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. सोमवारपासून फळबाजारही सुरू करण्यात आला. या बाजारात २५० गाडय़ांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये आंबा, चिकू, पपई, कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी, डाळिंब या फळांचे विशिष्ट गाडय़ांची आवक होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच गाडीतील माल खाली करण्यात येत आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत व्यापार करता येणार आहे. व्यापारी व ग्राहकांनी किमान १५ हजार रुपयांचा व्यापार करावा अन्यथा १ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक अंतर राखण्यासाठी नियमांचे पालन बंधनकारक असणार असून मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.