मुंबई : मुंबईत स्वत:चं हक्काचं घर खरेदी करणं हे प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं . मात्र, मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईतील जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त किंमत आहे. मात्र, तरीही मुंबईकरांची ओढ ही मुंबईतील घरांनाकडेच आहे. गेल्या तीन महिन्यात एकूण 6439 घरांची खरेदी करण्यात आली आहे. एकूण महसूलात 45 टक्के वाटा हा घर खरेदीचा आहे. त्यामुळे अजूनही मुंबईकरांची पहिली पसंती ही जुन्या मुंबईलाच आहे. यामध्ये सायन ते कुलाबा भागात मालमत्ता खरेदी सर्वाधिक झाली आहे. तीन महिन्यात 6439 घरांची खरेदी झाली आहे. त्याशिवाय, कुर्ला बोरीवलीलाही अधिक पसंती आहे. सर्वात कमी व्याजदर, मुद्रांक शुल्कातील कपात आदि सवलतींमुळे डिसेंबर महिन्यातील मालमत्ता खरेदीत अभूतपूर्व वाढ झाल्याचे दिसून आले. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीचा विचार केल्यास जुन्या मुंबईत सर्वाधिक घर खरेदी झाली. म्हणजे लॉकडाऊन आहे, धंदे बंद आहेत तरीसुद्धा लोकांची घर खरेदीसाठी देशातल्या सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या जुन्या मुंबईलाच पसंती मिळाली.
मुंबईकरांची पसंती असलेल्या कुलाबा, सायनमध्ये जमिनीचा भाव काय?
कुलाबा – 55,000 ते 1 लाख रुपये प्रति चौरस फूट
सायन – 30,000 ते 50,000 हजार रुपये प्रति चौरस फूट
सायन आणि कुलाबादरम्यान – 30, 000 ते 1 लाख रुपये प्रति चौरस फूट
मुंबईत घरं सहा लाखांनी स्वस्त होणार
मुंबईतील घरं सहा लाखांनी स्वस्त होणार आहेत. बांधकाम व्यावसायिकांना निवासी संकुल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या प्रीमियम शुल्कात कपात केल्याने, आता घरे स्वस्त होण्याची आशा बळावली आहे.हा लाभ घेणाऱ्या बिल्डरांना ग्राहकांचे मुद्रांक शुल्क स्वत: भरायचे आहे. पण, निव्वळ प्रीमियम कपातीचा लाभ ग्राहकांना मिळाल्यास मुंबईसारख्या शहरात सरासरी 6 लाख रुपयांपर्यंत घरे स्वस्त होऊ शकतात.
बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर (अधिमूल्य) 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील, त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला.