रानभाज्या व रानमेवा विक्रेते आदिवासी लोकांना शासकीय अनुदान मिळणे बाबत

प्रति,
श्री राजेश नार्वेकर,
जिल्हाधिकारी, ठाणे
स.न.



महोदय,
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील कष्टकरी जंगलातील त्या त्या सीझनमधील विविध प्रकारची रानभाज्या, रानमेवा आदी लोकोपयोगी विविध वस्तू शहापूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली ई.शहरातील बाजारपेठेत भल्या पहाटे येऊन नागरिकांपर्यंत पोहचवून आपला उदरनिर्वाह करतात.

शहापूर तालुक्यातील वासिंद किन्हवली डोळखांब , खर्डी , कसारा या परिसरातील दऱ्याखोऱ्यांत वास्तव्य करणारे आदिवासी जंगलात भटकंती करुन करवंद ,जांभळं ,कैऱ्या ,तोरणं , आदी रानमेवा गोळा करुन दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल , मे ,महिन्यात शहापूर ,कल्याण ,डोंबिवली ,ठाणे ,शहरात विक्रीसाठी घेऊन येतात मात्र ऊन्हाळ्यातच मिळणारा हा दुर्मीळ रानमेवा यंदा कोरोनाच्या महामारीमुळे विक्री साठी येऊ शकलेला नाही. हा रानमेवा सध्या बाजारपेठेतुन हद्दपार झाला आहे . यामुळे गरीब आदिवासींचा रोजगार देखील हिरवला गेला आहे . रोज २०० ३०० रुपयांच्या कमावाईवर पाणी फिरले आहे. या रानमेवा विक्रीतून आदिवासी महिलांना दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते. नैसर्गिक असल्याने हा रान मेवा मोठ्या आवडीने ग्राहक खरेदीसाठी करतात. १० रुपये वाटा याप्रमाणे कैऱ्या ,करवंद , तोरणं ,जांभळं ,यांची विक्री केली जाते. यामुळे उन्हाळ्यात त्यांचा निदान दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो.



कोरोना महामारीच्या कारणाने दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने त्यांचा रोजगार पूर्णपणे ठप्प झाला आहे. येऊर, शहापूर, कर्जत कसारा किंवा अन्य ग्रामीण भागातील लोकांना उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने लॉक डाऊन / बंद काळात त्यांचे हाल झाले आहेत. 


नियमित रोजगार असलेल्या कामगार, रोजंदारी कामगार अथवा कंत्राटी कामगार कामावर येऊ शकत नसल्यास त्यांचे वेतन कपात करु नये, असे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले आहेत. कामगार आयुक्त यांनी तसे नोटिफिकेशन ही जारी केले आहे. त्याच धरतीवर या कष्टकरी, आदिवासी लोकांना देखील सरकारने किमान दिवसाला दीडशे रुपये या दराने लॉक डाऊन / बंद काळातील रोख अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणी या पत्राद्वारे करीत आहोत.


आपल्या कडून लवकरात लवकर या उपेक्षित घटकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.
कळावे,
आपला,

जगदीश खैरालिया,
सेक्रेटरी - श्रमिक जनता संघ.
दि. १८ एप्रिल २०२०.

प्रत : मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.