नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, अजित पवारांनी ठणकावलं

 

पुणे : नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते. औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतलीय तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. 

राज्यात नामांतराशिवाय कोरोना, लसीकरण यावर काम होणं गरजेचं

-राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरुन चांगलाच गोंधळ सुरू आहे. यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नामांतराचा मुद्दा हा महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल. याव्यतिरिक्त राज्यात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. नामांतराचा मुद्दा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून सोडवतील, असं म्हणत नामांतरावर त्यांनी शिष्टाईची भूमिका दाखवली.

राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीत इनकमिंग, पुढेही होत राहतील

राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होतायत. मात्र पुढचे काहीच पक्षप्रवेश होताना प्रवक्ते हे माध्यमाला सांगतील. त्यामुळे तो काही मोठा प्रश्न नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे पुढच्या काळात पक्षप्रवेश होतील, असं सूचकपणे अजित पवार यांनी सांगितलंय.

मेहबुब शेख यांच्यावरील आरोपात तथ्य नाही

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावरती होत असलेल्या आरोपाचं अजित पवारांनी खंडन केलंय. मेहबूबवर झालेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. पोलीस तपासात योग्य माहिती समोर येईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाहीत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

महापालिका स्वतंत्र संस्था, तिला निर्णय घेण्याचा अधिकार

पुणे महापालिकेत या आधी जी 11 गावं समाविष्ट झालेत त्यामध्ये मिळणाऱ्या मिळकत करात झेडपी सीईओंनी सवलत दिलीये. त्याविरोधात महापालिका कोर्टात जाणार आहे. यावरती बोलताना अजित पवार म्हणाले, “पालिका स्वतंत्र संस्था आहे, ती निर्णय घेऊ शकते, मात्र जर यामध्ये कोणावर अन्याय होत असेल तर नगरविकास खात्याकडे तक्रार करता येते, मात्र जर शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांना टँक्स भरावाचं लागेल, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.