महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांची पत्राद्वारे भावनिक साद!

मुंबई: कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊ नये, अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्याऐवजी पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा असं आवाहन विश्वशांती सामाजिक संस्थेकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारो पत्र दादर पोस्ट ऑफिसमध्ये आले आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या हजारो अनुयायांनी पत्राद्वारे आपल्या भावना महामानवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेबांचे लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. मात्र, सध्या देशावर कोरोनाचं संकट आहे. अशावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून अनुयायांना चैत्यभूमीवर न येण्याची विनंती करण्यात आली होती. तसंच महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीचं दर्शन सह्याद्री वाहिनीवर आपण करु शकाल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यानुसार आज चैत्यभूमीवरील महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम शांततेत आणि मुख्यमंत्र्यांसह अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.