मुंबई : कोरोनाच्या सुरुवातीपासूनच्या काळात अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात यासाठी महापालिका अटोकाट प्रयत्न करत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून उद्यापासून म्हणजेच 2 नोव्हेंबर पासून मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी प्रकारच्या एकूण 244 ठिकाणी मोफत कोरोना वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महापालिकाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेमुळे मनपा क्षेत्रात कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा 300 पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली असून ज्यामुळे मुंबईकरांना कोव्हिड चाचणी अधिक सुलभतेने करण्याचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 विभागांमध्ये 244 ठिकाणी कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या 244 ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे http://stopcoronavirus.mcgm.gov.in या स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या समर्पित संकेतस्थळावर देखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे संभाव्य रुग्ण महापालिकेच्या ज्या विभागात रहात असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या ठिकाणांची माहिती, ही विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा 1916 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे.
सध्या सुरुवातीला दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान सदर 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी तर उर्वरित ठिकाणी अँटीजन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणार आहे.
महानगरपालिकेच्या अखत्यारीतील 244 ठिकाणांव्यतिरिक्त, महापालिका क्षेत्रातील 54 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोव्हिड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा सशुल्क स्वरूपात उपलब्ध आहे. यासाठी सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये 1800 रुपये तर वैद्यकीय प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करवून घेण्यासाठी 1400 रुपये एवढे शुल्क आहे.