बेस्टच्या अर्थसंकल्पात 1,887 कोटींची तूट, बेस्ट समितीच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्प महापालिकेत सादर


मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या २०२१-२२ या वर्षीसाठीच्या अर्थसंकल्पात एक हजार 887 कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी हा तूटीचा अर्थसंकल्प बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्याकडे 10 ऑक्टोबर रोजी सादर केला होता. या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असून महापालिकेच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. 


या अर्थसंकल्पात विद्युत पुरवठा विभागाचे तीन हजार 532 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले असून खर्च तीन हजार 596 कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे विद्युत विभागातच 263.59 कोटी रुपये तूट दर्शविण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या परिवहन विभागातही एक हजार 407 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले असून, तीन हजार 31 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. त्यामुळे परिवहन विभागात एक हजार 624 कोटी रुपयांची तूट दाखविण्यात आली आहे.


दोन्ही विभागांसाठी मिळून चार हजार 939 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले असून सहा हजार 827 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला एक हजार 887 कोटी रुपयांची तूट येणार आहे. दरम्यान ही तूट भरून कशी काढायची याबाबत बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी सूचना केल्या आहेत.