ठाणे : डोंबिवलीतील एका दाम्पत्याने बिल्डरकडून आठ कोटी उकळले. याप्रकरणी संबंधित बिल्डरने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलीस दाम्पत्याला पकडण्यासाठी त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांनी आधी दार उघडले नाही. पोलिसांनी अनेक तास दरवाजा ठोठावला. काही तासांनी अखेर पोलिसांनी वैतागून दरवाजा तोडला. तेव्हा आरोपी महिला पतीसह देवपूजेत लीन होती. अखेर पोलिसांनी डोंबिवलीहून पती-पत्नीला ताब्यात घेतलं. यावेळी आरोपी महिलेने प्रचंड तांडव आणि आरडाओरडा केला.
डोंबिवली पूर्वेतील नांदीवली परिसरात वर्गीस म्हात्रे आणि आर्यन सिंग या बिल्डरांना ब्लॅकमेल करुन आठ कोटी रुपये उकळले गेले. अखेर या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मानपाडा पोलिसांनी विद्या म्हात्रे तिचे पती विश्वनाथ म्हात्रे या दोघांसह सुनील म्हात्रे आणि एकनाथ म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. या दरम्यान चारही आरोपींनी अटक पूर्व जामीनासाठी कल्याण कोर्टात धाव घेतली. न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे.
आरोपी महिला विद्या म्हात्रे आणि तिचा पती विश्वनाथ म्हात्रे यांना अटक करण्यासाठी पोलीस डोंबिवली पूर्व येथील बालाजी कृपा सोसायटीत पोहोचले तेव्हा पोलिसांना विचित्र अनुभव आला. पोलीस अधिकारी एस.ए सिमटे आणि त्यांच्या पथकाने आरोपींचे दार ठोठावले. जवळपास तीन तास आरोपी पती-पत्नीने दार उघडले नाही. अखेर विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय साबडे हे घटनास्थळी पोहोचले.
आरोपी दार उघडत नसल्याने पोलिसांनी दार तोडण्याचा निर्णय घेतला. दार तोडल्यानंतर पोलीस आत शिरले. तेव्हा त्यांनी पाहिले की, आरोपी पती-पत्नी भटजीसोबत देवपूजा करत होते. देवपूजेसाठी तिने पोलिसांना तब्बल चार तास ताटकळत ठेवले. अखेर सहा तासांनंतर पोलिसांनी विद्या म्हात्रे, तिचा पती विश्वजीत म्हात्रे याना ताब्यात घेतले. मात्र या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची प्रचंड दमछाक झाली आहे