नवी मुंबईतील उद्यान घोटाळाप्रकरणी अधिकारी आणि कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई

 

नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत गाजत असलेल्या उद्यान घोटाळाप्रकरणी प्रशासनाकडून अखेर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. तीन सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मनपा उद्यान अधिकारी चंद्रकांत तायडे, सहाय्यक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी यांचा समावेश आहे. तर दोन कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात कोणतीही कामे न करता कंत्राटदारांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने 8 कोटींची बिले मंजूर करवून घेतली होती. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे नवी मुंबईत हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या घोटाळ्यातील कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 15 दिवसांत 8 कोटी 34 लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.