भैय्यासाहेब इंदिसे यांच्या पुढाकाराने जिल्हाप्रशासनाला दिले 2 हजार पीपीई किट

 

ठाणे (प्रतिनिधी)- कोरोनाचा नवीन स्ट्रेन आलेला आहे. या नव्या स्ट्रेनचा एक रुग्ण डोंबिवलीमध्ये सापडला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पीपीई किटसारख्या साधनांची कमतरता भासू नये, यासाठी  रिपाइं एकतावादीचे युवा नेते तथा माजी स्थायी समिती सभापती भैय्यासाहेब इंदिसे आणि कोरोना विशेषतज्ज्ञ डॉ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्याकडे 2 हजार पीपीई किट प्रदान करण्यात आले.
 सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे.  त्यातच आता दुसर्‍या स्ट्रेनची सुरुवात झाली आहे. अशा स्थितीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यास जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधने कमी पडू नयेत, या उद्देशाने भैय्यासाहेब इंदिसे यांनी सेव्हन हिल्सचे सहसंचालक डॉ. दिलीप पवार यांच्याशी संपर्क साधून जिल्हा प्रशासनासाठी सुमारे 2 हजार पीपीई किट मोफत उपलब्ध करुन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहाामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्याकडे हे पीपीई किट सुपूर्द केले. याप्रसंगी  वंचित आघाडीचे नेते राजाभाऊ चव्हाण, डॉ. किशोर बोरीचा आदी उपस्थित होते.  
 यावेळी वैदेही रानडे म्हणाल्या की, भैय्यासाहेब इंदिसे आणि डॉ. दिलीप पवार यांनी दिलेली ही मदत मोलाची आहे. आजही ग्रामीण भागात साधनांची कमतरता आहे. या मदतीमुळे ही कमतरता भरुन निघू शकते. भैय्यासाहेब इंदिसे यांनी, जिल्हा प्रशासनाकडे आज दोन हजार पीपीई किट सुपूर्द केले आहेत. मात्र, भावी काळातील हे संकट पाहता, आणखी साह्य करण्याची आमची तयारी आहे. जिल्हाप्रशासनाने सांगितले तर डॉ. पवार यांच्या मदतीने आम्ही व्हेंटीलेटर्सही उपलब्ध करुन देऊ, असे सांगितले. तर, डॉ. पवार यांनी, आगामी काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानेच ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य सेवेला साधनांची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही सदैव मदत करण्यास सज्ज आहोत, असे सांगितले.