महापौर नरेश म्हस्के यांचे पोलीस व महापालिका प्रशासनाला आदेश


विनामास्क वावरणाऱ्या व  सोशल डिस्टन्सींगचा अवलंब न करणाऱ्या


दुकानदार, फेरीवाले व नागरिकांवरील कारवाईची मोहिम प्रभावीपणे राबवावी


ठाणे :  कोविड 19 प्रदुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून वावरणे गरजेचे आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून दुकानदार, नागरिक विनामास्क वावरत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत होती मात्र ही संख्या पुन्हा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. करोना रुगणांची संख्या कमी व्हावी यासाठी विनामास्क वावरणाऱ्या दुकानदारांवर व सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणारी कारवाई अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहेत.


ठाणे शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा व ठाणे महापालिका प्रशासन मेहनत घेत आहे. या मेहनतीला यश देखील मिळाले असून गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे ही निश्चितच गंभीर बाब आहे. सद्यस्थितीमध्ये बहुतांश ठिकाणी मास्क व सोशल डिस्टन्सींगचा वापर होत नसल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका कार्यक्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर कारवाई चालू आहे. परंतु नागरिकांमध्ये दिवसेंदिवस करोनाचे गांभीर्य कमी झाल्याचे दिसून येत असल्याने सर्वच नागरिक बिनधास्त वावरत आहे असेही निदर्शनास येत आहे.


देशातील काही भागामध्ये करोनाची संख्या वाढत असल्याने त्या ठिकाणी पुनश्च लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे, अशी ‍ परिस्थिती ठाण्यात निर्माण होवू नये यासाठी करोनाप्रतिबंध उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी ठाण्यामध्ये  सार्वजनिक ठिकाणी  विनामास्क वावरणारे नागरिक, फेरीवाले, हातगाडीवाले यांच्यावर सध्या सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र करण्यात यावी तसेच बहुतांश ठिकाणी दुकानदार ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करीत नसल्याचेही दिसून येते अशा दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात यावी असेही निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनास दिले आहे.