मुंबई : मुंबईची ठप्प झालेली लाइफलाईन पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या हार्बर मार्गावर लोकल (Harbor line) बंद पडली होती. पहाटेच लोकल (Local) ठप्प झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले. पण तांत्रिक बिघाड (technical glitch) दुरुस्त करण्यात आली असून रेल्वे सेवा सुरू झाली आहे.
अधिक माहितीनुसार, वडाळ्याजवळील रेल्वे प्रकल्प बिघडल्यामुळे वडाळा ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसटी या सर्व गाड्या बंद होत्या. यामुळे चाकरमानी ऐनवेळी खोळंबले. सर्व रेल्वे या रुळावर उभ्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर रेल्वे प्रकल्पातील बिघाड दुरुस्तीचं काम सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद आहे. सरकार अनलॉकच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन प्रवाशाची सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर गेल्या आठवड्यात सरकारकडून सर्व महिलांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
‘मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट’
ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळीचं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन लवकरच रुळावर येण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ट्विटरवर एका प्रवाशाने याबाबत एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं. लवकरच लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी सरकार कामाला लागलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.