मुंबई : विविध ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर (Patrolling Police) लक्ष ठेवण्यासाठी त्याचबरोबर त्यांना अधिक जबाबदार आणि सक्षम बनविण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई पोलीस विभाग आता क्यूआर कोड या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. त्याच अनुषंगाने मुंबईच्या विविध ठिकाणी क्यूआर कोड लावला गेला आहे. त्या माध्यमातून संबंधित ठिकाणी पोहोचल्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस स्टाफला तिथे लावलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्याची अपडेटेड माहिती कंट्रोल रूमला पाठवावी लागणार आहे. संबंधित पेट्रोलिंग करणारा पोलीस कर्मचारी ठरावीक ठिकाणी गेला होता की नाही, हे क्यूआर कोडच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे.
सध्या काही महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड सिस्टीम लावली गेली आहे. लवकरच मुंबईभर अशी व्यवस्था सुरू केली जाणार आहे. ही सिस्टीम पूर्णतः लागू झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर नजर ठेवणं सोप होणार आहे आणि इतर कामात पोलीस आपला वेळ वाया घालवणार नाही. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्येक दोन तासांत आपली आणि संबंधित ठिकाणाची माहिती क्यूआर कोड स्कॅन करून द्यावी लागणार आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजारांपेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते (Facebook fake accounts), असा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावर सायबर सेलने आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे.
“मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सुरू असलेल्या अभियानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता सायबर सेल या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू करत आहे”, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले होते. दुसरीकडे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी खोटे क्यूआर कोड पास बनवून देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तसेच ज्या व्यक्तींना त्याने पास बनवून दिले आहेत, त्यांनाही अटक करण्यात आली होती. खोटे क्यूआर कोड पास बनवल्याप्रकरणी मुंबईत एकूण सहा गुन्ह्यांची नोंद झाली होती.