सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण, धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण झाली आहे. यामुळे दिवाळीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोने दर 51 हजार प्रतितोळ्यांवर पोहोचला आहे तर चांदीचे दरही कमी झाले आहेत.
सोने आणि चांदीचे दर पहिल्यांदाच दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या तोंडावर घसरले आहेत. इतर वेळी याच काळात सोने व चांदीचे दर वाढत असल्याचा पूर्वानुभव आहे. मात्र, जळगावात आज (गुरुवारी) सोने 51 हजार 200 रुपये प्रति तोळा (3 टक्के जीएसटी वगळून) तर चांदीचे दर 64 हजार 500 रुपये प्रतिकिलो (3 टक्के जीएसटी वगळून) असे आहेत. बुधवारी सोन्याचे भाव 53 हजारांच्या घरात गेले होते. आज दोन हजरांनी सोनं कमी झाल्याने गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.
पुण्यात सोन्याचा भाव 52 हजार रुपये तोळ्यावर पोहोचला आहे तर चांदी 65 हजार रुपयांवर आहे. ऐन दिवाळीत सोन्याचे भाव घसरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खरंतर, कोरोना लसीचा दावा आणि अमेरिका निवडणुकांमध्ये सोन्याच्या किंमतींसह शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला. यामुळे सतत सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, दिवाळीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सोनं खरेदी करतात. यावेळी सावधानता बाळगणं आवश्यक आहे. अनेक वेळा फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कधी खालच्या दर्जाच्या सोन्याची विक्री केली जाते तर कधी फक्त सोन्याचं पाणी लावलेलं असतं. त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे.
सोन्याचा भाव माहित असूद्या…
जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर सगळ्यात आधी चालू दिवसाचे सोन्या-चांदीचे भाव माहिती असूद्या. यासाठी तुम्ही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट https://ibjarates.com/ वर भेट देऊ शकता. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल. खरं सोनं हे 24 कॅरेटचंच असतं. पण याचा अद्याप कोणताही पुरावा नाहीये. कारण ते खूप मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो ज्यामध्ये 91.66 टक्के सोनं असतं.
दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करा
तुम्ही दागिने विकत घेण्यासाठी गेला असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना याची खात्री करा. कारण, सोनं विकताना, हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा.