मुंबई : दरवर्षी प्रमाणेच ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss) पर्वदेखील भलत्याच वादामुळे चर्चेत आले आहे. तसे बघायला गेले तर, ‘बिग बॉस’ आणि ‘वाद’ हे समीकरण काही नवे नाही. दरवर्षी काहीना काही वादंग या घरात माजत असतात. ‘मराठीची चीड’, येते म्हणणाऱ्या जान विरोधात अवघा महाराष्ट्र एकवटला होता. या प्रकरणी कलर्स वाहिनी आणि जान सानूने माफिदेखील मागितली. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात चक्क ‘झिंगाट’ गाणे वाजवण्यात आले.
भाषावादाने नाराज झालेल्या प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी घरात मराठी गाणे वाजवण्यात आले होते. लोकप्रसिद्ध ‘झिंगाट’ गाणे लावून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याची कुजबुज प्रेक्षकांमध्ये होती. मात्र, या गाण्यावर स्पर्धकांनी धमाल नृत्य करत आपल्या दिवसाची ‘झिंगाट’ सुरुवात केली.
सकाळी आलार्म म्हणून वाजते गाणे
सकाळी सकाळी गाणे वाजवून स्पर्धकांना झोपेतून जागे करण्याची प्रथा ‘बिग बॉस’च्या घरात फार आधीपासून सुरू आहे. घड्याळ किंवा आलार्म नसलेल्या या घरात ‘बिग बॉस’ गाणे वाजवून स्पर्धकांना जागे करतात. दररोज वेगवेगळी गाणी वाजवली जातात. या गाण्यांवर नृत्य करत स्पर्धकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात करायची असते. ‘बिग बॉस’च्या घरात तशी नेहमी हिंदी गाणीच वाजताना दिसतात, मात्र, नुकत्याच झालेल्या वादानंतर घरात चक्क मराठी गाणे वाजवण्यात आले.