बील भरा नाहीतर मृतदेह मिळणार नाही - खाजगी रुग्णालयांची अरेरावी सुरूच
मीरा रोड :
भाइंदरच्या एका खासगी रुग्णालयाने बिलाचे पैसे दिले नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह तब्बल नऊ तास अडवून ठेवला. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास रुग्णालयाने तुमचा रुग्ण गंभीर असल्याचे कळवल्याने मुलगी, मुलगा व अन्य नातलग रुग्णालयात दाखल झाले. सकाळी ८ च्या सुमारास रुग्णालयाने मृतदेह हवा असेल, तर आधी दोन लाख २६ हजार भरा, असे सांगितले. इतके बिल झाले कसे आणि आधीच कर्जबाजारी झाल्याने आम्ही पैसे कुठून भरायचे, असा सवाल कुटुंबीयांनी केला. परंतु, पैसे भरा नाहीतर मृतदेह मिळणार नाही, असे रुग्णालयाने सांगितले.
मुलगी आणि मुलगा आपल्या आईचा मृतदेह मिळावा, यासाठी रुग्णालयाच्या आवारात बसून असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना कळताच त्यांनी व्यवस्थापनाच्या शालिनी अय्यर यांना फोन केला आणि चांगलेच खडसावले. मग, रुग्णालयाने मृतदेह देण्यासाठी आधी दीड लाख व नंतर ५० हजार तरी भरा, असे नातलगांना सांगितले. पण,आपल्याकडे केवळ १० हजारच शिल्लक असल्याचे नातलगांनी स्पष्ट केले. नवघर पोलिसांकडे सरनाईकांनी तक्रार केल्यावर पोलीस रुग्णालयात दाखल झाले. सुरुवातीला आमचे व्यवस्थापक येतील, असा वेळकाढूपणा रुग्णालयाने केला. परंतु, तक्रार करून कारवाई करायला लावू नका, असे सरनाईकांनी खडसावल्यावर दुपारी ४ च्या सुमारास मृतदेह देण्यास रुग्णालय तयार झाले.
महिलेच्या मुलीने आईचे दागिने गहाण ठेवून व उसने पैसे घेऊन रुग्णालय आणि औषधांचे पावणेपाच लाख रुपये भरले. पण, रुग्णालयाने आणखी दोन लाख २६ हजारांचे बिल भरा सांगत मृतदेह अडवून ठेवला होता. आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णालयाने मृतदेह दिला. उत्तनच्या भुतोडी बंदर येथे राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेस भाइंदर पूर्वेच्या फॅमिली केअर रुग्णालयात श्वसनाचा त्रास होत असल्याने मुलगी व मुलाने २६ जून रोजी उपचारासाठी दाखल केले होते. सामान्य कुटुंबातील रुग्ण महिलेची मुलगी १० ते १२ हजार पगाराची नोकरी करते.
रुग्णालयाने पैसे मागितले तसे स्वत:जवळचे होते तेवढे भरले. नंतर, आईचे दागिने गहाण ठेवून पैसे आणून रुग्णालयात भरले. नातलग व नातेवाइकांकडून मिळतील तेवढे उसने व मदत म्हणून पैसे जमवले, तेही रुग्णालय व औषधासाठी खर्च झाले. रुग्णालयास दोन लाख ६० हजार, तर तेथील मेडिकल व औषधांसाठी सव्वादोन ते अडीच लाख खर्च झाले, असे मुलीने सांगितले. पैसे भरले नाहीत, तर मेडिकलमधून औषधे दिली जात नसत.शनिवारीही उपचार होत नसल्याने स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी गेल्या होत्या.