उपनगरीय रेल्वे ऑगस्टपासून सुरु होण्याची शक्यता
मुंबई
लॉकडाऊनच्या काळात मुंबईची लाइफलाईन लोकल सेवा बंद ठेवण्यात आली. त्यानंतर आता हळूहळू रेल्वे सेवा पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे. उपनगरी रेल्वेगाड्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यासंदर्भातली माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सध्या अनलॉकच्या काळात रेल्वे प्रशासनानं १५ जूनपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु केली. मात्र आता लवकरच उपनगरी रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं रेल्वेगाड्या सुरु झाल्यास अनेकांना दिलासा मिळणारेय. रेल्वेचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित नसल्याने यात राज्य सरकारला काहीच करता येत नाही. मात्र केंद्र सरकार याबाबत विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.