कोरोना रुग्णांचे बिल आता लेखापरिक्षक तपासणार
- 'स्वस्तिक हॉस्पिटल' लुटमार प्रकरणानंतर ठाणे पालिका प्रशासनाला जाग
- खासगी रुग्णालयाची 'वाटमारी' रोखण्यासाठी मनसेने सुरु केलेल्या लढ्याला यश
ठाणे
कोरोना उपचारानंतर अवाजवी बिल देत गोरगरिब रुग्णांचे खिसे कापणार्या खासगी रुग्णालयांना आता चाप बसणार आहे. आठवड्याभरापूर्वी 'स्वस्तिक हाॅस्पिटल'ने रुग्णाची लुटमार केल्याच्या गंभीर प्रकरणाला मनसेने वाचा फोडल्यानंतर पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांचे बिल योग्य पध्दतीने तपासण्यासाठी थेट लेखापरिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाची 'वाटमारी' रोखण्यासाठी मदत होणार असून मनसेच्या लढ्याला यश मिळत असल्याने खासगी रुग्णालयाचे धाबे दणाणले आहेत.
कोरोना लढ्यात एकीकडे राज्यशासन 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' अशी भावनिक साद नागरिकांना घालत असताना ठाण्यात माञ या उक्तीच्या विरोधात जात काही खासगी रुग्णालय व मेडिकल चालकांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली आहे. कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासन वापरत असणारे पीपीई कीट थेट तिप्पट दराने रुग्णांच्या माथी मारले जात असल्याच्या स्वस्तिक हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी पाचंगे यांच्याकडे त्यांची व्यथा मांडताच या प्रकरणी पालिका आणि एफडीए विभागाकडे पाचंगे रितसर तक्रार दाखल केली होती. रुग्णालय प्रशासनाचा बिलांबाबतचा गलथानपणा रोखा, अशी विनंती संदीप पाचंगे यांनी ठाणे पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांची भेट घेत केली होती. त्यानुसार तात्काळ पालिका प्रशासनाने १५ कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दिल्या जाणार्या बिलांचे लेखापरिक्षण करण्यासाठी ८ कनिष्ठ लेखापरिक्षकांची नेमणूक केली. सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णांच्या बिलांबाबत ठरवून दिलेल्या निकषांनुसार बिल रुग्णालय प्रशासनाने दिले का, यावर या टीमची करडी नजर राहणार आहे. दैनंदिन किमान १०० बिलांची तपासणी पुर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने या लेखापरिक्षकांना दिले आहेत.