ठाणेकरांसाठी कोरोना चाचणी मोफत सुरु करा- प्रताप सरनाईक

आमदार प्रताप सरनाईक यांची ठाणे शहरातील नागरिकांसाठी 'कोविड १९' म्हणजेच कोरोना चाचणी मोफत सुरु करण्यांची मागणी


ठाणे



ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने दरदिवशी वाढत आहे. आता तर ही संख्या जवळपास अकरा हजाराच्या वर गेलेली आहे. त्यामुळे 'कोरोना'चा प्रचंड प्रमाणात होणारा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. 


ठाणे मध्ये कोरोना रुग्णांची तसेच संशयितांची संख्या वाढत असल्याचे रोजच्या आकड्यावरून दिसते. जोपर्यंत एखाद्याला कोरोना झालाय हे अधिकृतरीत्या समजत नाही, त्याचे निदान होत नाही तोपर्यंत तो संशयित रुग्ण इतर अनेकांच्या कळत - नकळत संपर्कात येत राहतो व त्यामुळे ही रुग्णसंख्या वाढू शकते. तसेच अहवाल आल्याशिवाय त्या रुग्णाला पालिका किंवा खासगी रुग्णालये त्यानुसार उपचारही सुरु करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत 'कोरोना'चे लवकर निदान झाल्यास वेळेत उपचार सुरू करणे शक्य होऊन संबंधित रुग्ण लवकर बरा होण्याची संभाव्यता अधिक असते. 


कोरोनाची चाचणी महाग असल्याने ती मोफत करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सुनावणी करताना कोरोना विषाणू चाचणी मोफत होण्याबाबत सुप्रीम कोर्टाने याआधी काही आदेश सरकारला दिले आहेत. त्या आदेशानुसार, गरीब वर्गाला मोफत चाचणीचा लाभ घेता येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील, ईडब्ल्यूएस आणि आयुष्मान भारतचा लाभ घेणाऱ्या रुग्णांसाठी ही चाचणी मोफत असेल असे आदेश असल्याची माझी माहिती आहे.


ठाणे शहरात कष्टकरी, गरीब लोक मोठ्या प्रमाणात राहतात. 'टाळेबंदी'मध्ये लोक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या घटकाला अडीच - तीन हजार देऊन कोरोना चाचणी करून घेणे शक्यच नाही. खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून चाचणी करण्यासाठी लागू केलेले दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत.


ठाणे शहरातील गरीब वस्ती, झोपडपट्ट्या किंवा दाट लोकवस्तीच्या भागात पालिकेने तात्काळ मोफत कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात करावी. नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यासाठी पालिकेची आरोग्य केंद्र व मोक्याच्या ठिकाणी मोफत कोरोना तपासणी केंद्र सुरु करावीत. तेथे swab घेण्यात यावेत. काही राज्यांमध्ये 'कोविड १९ - स्वाब कलेक्शन बूथ' तयार करण्यात आले आहेत. मुंबई सह काही शहरांमध्ये मोफत चाचण्या चालू आहेत. त्यानुसार ठाणे पालिकेनेही तात्काळ उपाययोजना कराव्यात.


ठाणे शहरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात वेळीच आता मोफत कोरोना चाचणी वेगाने सुरु करणे गरजेचे बनले आहे. एखाद्या संशयिताच्या आजाराचे निदान होण्याच्या दृष्टीने तपासणीचे म्हणजेच टेस्टिंगचे प्रमाण वाढवले तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तपासणी व त्याचा तात्काळ अहवाल येणे व त्यानंतर लगेच त्या रुग्णावर उपचार सुरु करणे गरजेचे आहे. वेळीच आजाराचे निदान होऊन जर तो रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह असेल तर त्याला लवकर बरे होता येऊ शकते,  तसेच या आजराचा प्रसारही थांबण्यास मदत होऊ शकते.


ठाणे शहरात कोरोना संशयित नागरिक असतील त्यांच्या किंवा कोरोनाचे 'हॉटस्पॉट' असतील त्या भागामध्ये जास्तीत जास्त चाचण्या होणे गरजेचे आहे. सगळेच नागरिक स्वतःहून येऊन चाचण्या करणार नाहीत. कारण टाळेबंदी,  आर्थिक अडचण लोकांना आहे. अशावेळी कोरोना प्रसार थांबावा म्हणून आपणच आत्ता टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे व त्याबाबत आढावा घेऊन निर्णय घ्यावा. कोरोना चाचणी वेळेवर होणे व लवकर त्याचा अहवाल येऊन त्या रुग्णावर वेळेवर वैद्यकीय औषधोपचार सुरु करणे याला पालिकेने प्राधान्य द्यावे.


याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांकडे तात्काळ ठाणे शहरातील नागरिकांची मोफत कोरोना चाचणी सुरु करण्याची मागणी पत्राद्वारे केली.