औषधांची मागणी वाढल्याने काळाबाजार सुरू
ठाणे
कोरोनाची लागण झालेल्या अत्यवस्थ रूग्णांच्या शरीरातील विषाणूंचे प्रमाण कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन सध्या महत्वपूर्ण ठरते. मे महिन्यात केंद्राच्या कोरोना टास्क फोर्सने ठाण्यातील पाहणी केली असता मृत्यूदर कमी करण्याच्या उपाय-योजना करण्यास प्रशासनाला सांगितले. यावर दोन महिन्यानंतर ठाणे महापालिकेला जाग आली असून या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची निविदा काढण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या निविदेच्या प्रक्रियेत अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हे औषध ठाणेकरांना मिळण्यासाठी सप्टेंबर उजाडेल,
सिप्ला, हिटेरो या दोन कंपन्यांकडून रेमडेसिव्हिर या औषधाचे उत्पादन केले जाते. हे औषध काही ठिकाणी औषध विक्रेत्यांना न देता ते रूग्णालयांना पुरवण्यात येत आहे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे या औषधाचीही मागणी वाढत आहे. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत सध्या ५४०० रूपये आहे. या औषधांची मागणी वाढल्याने काळाबाजारही सुरू झाला आहे. याचबरोबर टोसीलि झुमॅब नावाचेही दुसरे महागडे इंजेक्शन काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांना दिले जात आहे. त्याची किंमत २१ ते ३२ हजारांच्या घरात आहे. पण या औषधांचा काळाबाजार होत असल्याने या औषधाची वाढीव दराने विक्री होत आहे. ठाण्यातील रूग्णांना हे औषध लवकर उपलब्ध करुन देताना काळाबाजार होणार नाही याचीही दक्षता पालिकेने वेळीच घेणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रुग्णांना प्रति वायल ४१५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे औषध मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रूग्णांना मोफत भेटणार आहे. ठाणेकरांना संपुर्ण डोससाठी २० ते २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. पालिकेने सध्या हे औषध ठाण्यात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.