जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक संपन्न



मुंबई


 जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या तीन चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वाना पुरेशी माहिती झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक असून कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, यामध्ये शहरांतील नागरिक, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या जेणेकरून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 सर्व सुचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली तर आपल्याला अपेक्षीत यश मिळेल. यापूर्वीचे पालिकांतील काही अधिकारी बदलले कारण ते कार्यक्षम नव्हते असे नाही पण आता कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होते आहे त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पाउले उचलणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारण्यास सुरूवात करून कंपन्या, संस्था यांचीही मदत घ्यावी असं त्यांनी सांगितलं. लोकांनी स्वत:हुन चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला त्याप्रमाणेच कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी अजोय मेहता यांनी जिल्ह्यात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असून हा चिंतेचा विषय बनल्याचं सांगितले. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, संस्थात्मक विलगीकरण वाढविणे, नॉन कोव्हीड रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, सर्व पालिकांमध्ये समान प्रमाणात बेड्सचे नियोजन असावे. ऑक्सिजन सुविधा असलेले बेड्स वाढवावे, पावसाळा असल्याने सर्दी, तापाचे, खोकल्याचे रुग्ण यांना उपचार मिळण्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. यावेळी विविध पालिका आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.