सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरणा केंद्रे सुरू राहणार

नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरणा केंद्रे सुरू राहणार


महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आदेश



ठाणे


महापालिका कार्यक्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता कर देयके अदा करणे सोयीस्कर व्हावे यासाठी 15 सप्टेंबरपर्यत प्रभागसमिती स्तरावरील मालमत्ता संकलन केंद्रे व त्या संलग्न असलेली कार्यालये सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी व रविवारी देखील सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.


            कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोना प्रतिबंध उपाययोजनेमध्ये व्यस्त आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक बाहेर जावू शकत नसल्यामुळे मध्यंतरीच्या काळात नागरिक आपला कर भरू शकत नव्हते. नागरिकांना सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पध्दतीने भरता यावीत यासाठी महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांना आपली देयके भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी शनिवारी व रविवारी देखील महापालिका प्रभागस्तरावरील मालमत्ता कर संकलन केंद्रे व त्या संलग्न असलेली सर्व कार्यालये 15 सप्टेंबरपर्यत सुरू राहणार आहेत.


            ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर अशी संपूर्ण रक्कम भरतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये (अग्निशमन कर वगळता) सूट देण्यात येणार आहे. सन 2020-21 या संपूर्ण मालमत्ता कर 15 सप्टेंबरपर्यत भरल्यास 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत भरल्यास 4 टक्के, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भरल्यास 3 टक्के तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरल्यास 2 टक्के सूट देण्यात येणार आहे.शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2020 रोजी गणेशोत्सव असल्याने या दिवशी सर्व कार्यालये बंद राहतील. नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या ऑनलाईन पध्दतीचा व प्रत्यक्ष कार्यालयात जावून कर भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.