ठाणे व पालघर जिल्ह्यात यावर्षी `आरोग्य उत्सव'
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे आवाहन
ठाणे
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव रद्द करत आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याचे आज जाहीर केले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मंडळानी लालबागचा आदर्श घेत `आरोग्य उत्सव' साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.
नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनाला येतात. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा गणेशोत्सवाच्या माध्यमातून फैलाव होऊ नये म्हणून गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. मात्र 'देश हाच देव' मानून यंदा आरोग्य उत्सव साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे. ११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार असल्याचे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जाहीर केले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मंडळानी सुद्धा लालबाग मंडळाचा आदर्श घेत ११ दिवस विविध आरोय विषयक उपक्रम सामाजिक अंतर राखुन आणि कायद्याचे पालन करुन करावे आवाहन मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी केले आहे.