सिग्नल शाळेच्यामागे पालिका भक्कमपणे उभी राहील
आयुक्तांनी केला बारावी पास दशरथ पवारचा सत्कार
ठाणे ठाण्यासारख्या महानगरांमध्ये स्थलांतरीत कुटुंब आश्रयाला येतात. स्थलांतरामागचे मुळ कारणावर उत्तर मिळण्यापर्यंत शहरातील अशा कुटुंबीयांच्या मुलांच्या मुलभुत शिक्षणासाठी पालिका प्रयत्नशील राहिलच. त्याचबरोबर सिग्नल शाळेसारखा प्रयोग जो देशाच्या पातळीवर आदर्श प्रयोग म्हणून नावाजला गेलाय त्या प्रयोगाच्या मागे देखील ठाणे महानगरपालिका भक्कमपणे उभी राहिल असा विश्वास व्यक्त करत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सिग्नल शाळेतुन शिक्षण झालेल्या दशरथ पवार याचा बारावी पास झाल्याच्या निमित्ताने आयुक्त कार्यालयात सत्कार केला व त्याला भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सिग्नल शाळेसारखा प्रयोग ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत उभा राहिला याचा ठाणे महानगरपालिका व प्रत्येक ठाणेकरांला अभिमानाचा विषय आहे. पुलाखालील मुले ही आपल्याच राज्याची नागरिक आहेत त्यांचा सर्वांगिण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या सर्व पन्नास मुलांच्या व पर्यायाने सिग्नल शाळेच्यामागे ठाणे महानगरपालिका भक्कमपणे उभी राहील असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला. यावेळी बारावी परिक्षा उत्तीर्ण झालेला सिग्नल शाळेचा विदयार्थी दशरथ पवार यांचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आपल्या दालनात सत्कार केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर हे देखील उपस्थित होते.
समर्थ भारत व्यासपीठ सारख्या सामाजिक संस्थाच्या सहभागाने ठाणे महानगरपालिका शाळाबाह्य मुलांसाठी करीत असलेले काम वाखाण्यासारखे असून ठाणे महानगरपालिकेसाठी देखील सिग्नल शाळा हा उपक्रम अभिमानाचा आहे. यावेळी आयुक्तांनी सिग्नल शाळेच्या पाच वर्षांच्या प्रवासाची माहिती समजुन घेतली व यापुढे देखील शाळेला पालिकेच्यावतीने भरीव पाठींबा देत दशरथ पवार याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, सिग्नल शाळेच्या शिक्षिका आरती परब, प्रियांका पाटील उपस्थित होत्या.