कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांची बदली तर चार नर्स कार्यमुक्त

कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांची बदली तर चार नर्स कार्यमुक्त



ठाणे 


भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या ग्लोबल हब येथील रुग्णालयातील गोंधळ प्रकरणी केलेल्या तक्रारींची महापालिका आयुक्तांनी दखल घेतली. या प्रकरणी कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश शर्मा यांची बदली करण्यात आली आहे तर चार नर्सना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसंच यापुढे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या मनगटावर टॅग लावण्याबरोबरच, चेहरा दिसेल अशा बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला आहे.


या रुग्णालयात भालचंद्र गायकवाड यांना बेपत्ता दाखविण्यात आले होते. मात्र त्यांचा मृतदेह जनार्दन सोनावणे यांच्या कुटुंबियांना देण्यात आला तर सोनावणे यांच्यावर मोरे नावाने उपचार सुरू होते. या प्रकरणी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यपाल तसंच महापालिका आयुक्तांकडे दाद मागण्यात आली होती. या पाठपुराव्याची गंभीर दखल घेत आज संध्याकाळी पालिका आयुक्तांनी ही कारवाई केली. डॉ. योगेश शर्मा यांची मूळ पदावर राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिक्षक पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नर्स पूजा सावंत, जीरा धनका, रवीना आणि कामिनी भोईर यांना रुग्णालयाच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांची बैठक व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कोविड हॉस्पिटलच्या कारभारात सुधारणा होण्याची अपेक्षा ठाणेकर व्यक्त करीत आहेत.