कोचिंग क्लासेस सुरु करायला परवानगी द्या - जिल्हाधिकाऱयांना निवेदन 
कोचिंग क्लासेस सुरु करायला परवानगी द्या 

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन 

 


    ठाणे,

 

10 जुलै पासून किमान 10वी आणि 12 वी चे कोचिंग क्लासचे वर्ग सुरु करण्याची परवानगी द्यावी तसेच आम्ही सामाजिक अंतर आणि सर्व नियमांचे पालन करु अशा आशयाचे निवेदन आज कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे राज्य सचिव सचिन सरोदे, सतिश देशमुख, प्रकाश पाटील, सुनिल सोनार, अनिल काकुळते आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. शिक्षण या विषयासंदर्भात शासन गंभीर नसून कोणतेही ठोस धोरण जाहीर करत नाही. घर भाडे, क्लासच्या जागेचे भाडे गेले चार महिने थकले आहे. क्लासेसमध्ये शिकविणाऱया शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या यावेळी निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी चर्चेदरम्यान सकारात्मक प्रतिसाद दिला.  संघटनेच्या वतीने ऑनलाईन आंदोलनची मोहिम गेले महिनाभर राबविली.  या आंदोलनात महाराष्ट्रातील 3724 क्लासेस संचालक यांनी सहभाग नोंदवला. आज महाराष्ट्रातील सर्व जिह्यातील जिल्हाधिकारी यांना एकाच वेळी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.  

सामाजिक अंतराचे पालन करत (एका बाकावर एक विद्यार्थी) व इतर काही अटी शर्तीवर क्लासेस सुरु करण्याची परवानगी मिळावी, शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा व्हावी, तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोचिंग क्लासेस संदर्भात प्रलंबित, रद्द केलेला कच्चा मसुदा व बरखास्त केलेली समिती याबाबत लवकरात लवकर सर्व संघटनेच्या सभासदाचे प्रतिनिधींना सोबत घेऊन आणि नवीन समिती स्थापन करून नवीन मसुदा बनविण्यात यावा. क्लासेस सुरु करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते क्लासेस सुरु होईपर्यंत माफ करावेत आणि त्यावरील व्याज माफ करावे. क्लासेसला लघुव्यवसायचा दर्जा देवून त्यांच्या साठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे. क्लासेस चा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.