रस्त्यांवरील खड्ड्यात डबकी तयार होऊन साथीचे रोग पसरण्याची भीती

रस्त्यांवरील खड्ड्यात डबकी तयार होऊन साथीचे रोग पसरण्याची भीती


डोंबिवली


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये महापालिकेची इतर कामे कामे ठप्प झाली होती. शहरातील बहुतांश ठिकाणी केडीएमसी आणि अन्य प्राधिकरणांकडून रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण, मलवाहिनी आणि अन्य सुविधा देण्यासंदर्भात खोदकामे सुरू होती. आता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची अर्धवट स्थितीतील कामे मार्गी लावण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखवला असला, तरी काही ठिकाणची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे याठिकाणी पावसाच्या पाण्याची डबकी तयार होऊन साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.


मागील पावसाळ्यात खड्यांनी वाहनचालकांचे कंबरडे मोडले. हिवाळा आणि आता उन्हाळ्यातही खोदकामांचा सिलसिला सुरूच राहिला. अनेक महिने हे रस्ते वाहतुकीपासून बंद ठेवावे लागले असून ठाकुर्लीतील ९० फूट रोडवर हे चित्र आजही कायम आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याने कामांना विलंब लागत असल्याचे कारण दिले जात होते. आता कोरोनामुळे या कामांना पूर्णपणे खीळ बसली आहे. अर्धवट कामे झालेले काही रस्ते वाहतुकीसाठी अजूनही बंद आहेत. पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे म्हणून महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे डांबराच्या पॅचने भरणे आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले होते. यातील काही कामे सुरू झाली, तर काही अर्धवट स्थितीत जैसे थे'च आहेत.