मॉल, बाजार संकुलांना अद्याप परवानगी नाही

मॉल, बाजार संकुलांना अद्याप परवानगी नाही


ठाणे :


ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यांपुर्वी टाळेबंदी लागू करण्यात आली. महापालिका प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली असून यामुळे शहरातील बाजारपेठा आणि दुकाने शुक्रवारपासून सम-विषम पद्धतीने सुरू होणार आहेत. मॉल आणि बाजार संकुलांना वगळता सर्व बाजारपेठ आणि दुकाने सम-विषम पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार रस्त्यांच्या एका बाजुची दुकाने सम तारखांना उघडण्यात येणार आहेत तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकाने विषम तारखांना उघडण्यात येणार आहेत. ही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहणार आहेत.


 यामुळे जीवनावश्यक वस्तु, दुध, औषधालये आणि भाजीपाला दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तुंची दुकाने बंद आहेत. त्यात कपडे, हार्डवेअर, स्टेशनरी तसेच अन्य साहित्यांची दुकानांचा समावेश होता. या बंदीमुळे शहराची अर्थव्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र आहे. मात्र, ही अर्थ व्यवस्था आता पुन्हा रुळावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरातील बाजारपेठा आणि इतर साहित्यांची दुकाने सुरु करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.  ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम मारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी, ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठय़ा आस्थापना आहेत तर जांभळीनाका मोठी भाजीमंडई, खारकर आळीत मोठी धान्य बाजारपेठ आहे. हे सर्वच शुक्रवारपासून सुरु होणार आहे.


 नौपाडा आणि कोपरी भागातील आस्थपना आणि बाजारपेठा सुरु करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून याबाबत व्यापाऱ्यांसोबतही बैठका झाल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून आस्थपना आणि बाजरपेठा सम-विषम पद्धतीने सुरु होतील, असे या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यानी स्पष्ट केले. तर शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागात जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरु केली जाणार असून तशा सुचना प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.