रिकाम्या बीएसयुपी इमारती ताब्यात घेण्याची कारवाई सुरू
ठाणे
सातत्याने वाढ होत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या हायरिस्क नागरिकांची संख्या वाढत आहे. अशा नागरिकांसाठी क्वारंटाईन सेंटरही कमी पडू लागले आहेत, त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाने बीएसयुपीच्या रिकाम्या इमारती ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील हायरिस्क नागरिकांच्या विलगीकरणासाठी ठाण्यात पाच हजारहून जास्त क्षमतेचे कक्ष आहेत, मात्र या जागाही कमी पडू लागल्याने शहरातील रिकाम्या बीएसयुपी इमारती ताब्यात घेण्याची कारवाई ठाणे महापालिकेने सुरु केली आहे, त्यामुळे बीएसयुपी लाभार्थींमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
ठाणे शहरात दिवसाला १५० च्या आसपास आणि कधी-कधी 190 च्या पुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा आकडाही मोठा आहे. त्यात भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटरची क्षमता देखील संपली आहे. ठाण्यातील एवढ्या दूर हायरिस्क नागरिकांना घेऊन जाणे शक्य नसल्याने आता त्याच प्रभाग समितीच्या रिकाम्या बीएसयुपी इमारतींमध्ये अशा नागरिकांना क्वारंटाईन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.