आदिवासी शेतकऱ्यांनी केली काजूच्या बागा फुलवण्यास सुरुवात

आदिवासी शेतकऱ्यांनी केली काजूच्या बागा फुलवण्यास सुरुवात


बदलापूर 


जंगलात सहजपणे उपलब्ध होणारा रानमेवा गोळा करून त्याची विक्री करणे असा काहीसा रोजगाराचा पारंपारिक मार्ग आदिवासींकडे आहे. परंतु गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी पारंपरिक पिकांसोबत नगदी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. वडिलोपार्जित शेती आणि कालांतराने आदिवासी गावांना सामूहिक आणि वैयक्तिकरित्या मिळालेल्या वनपट्टय़ांचा वापर आता आदिवासींनी फळबागा फुलवण्यासाठी केला आहे. पावसाळी शेती, नंतर मिळेल ते काम आणि उन्हाळ्यात रानमेवा गोळा करून विकणे ही जगण्याची चौकट ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी मोडून काढू लागले आहेत. कोकणातील हापूस आंब्याच्या खरेदी-विक्रीतील भले मोठे अर्थकारण लक्षात घेऊन मुरबाड, शहापूर तसेच आसपासच्या भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे मोर्चा वळवला असून हापूस आंबा, काजूच्या बागा फुलवण्यास सुरुवात केली आहे.


मुरबाड तालुक्यातील विविध आदिवासी पाडे आणि गावांमध्ये सध्याच्या घडीला हापूस आंब्यांची लागवड केली आहे. मुरबाड तालुक्यात सध्या जवळपास २०० हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यातील ६० टक्के  म्हणजे १२० हेक्टर जमीन आदिवासी कसत असून त्यात हापूस, केशर, लंगडा आणि पायरी या आंब्यांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे ५० टक्के  प्रमाण हापूस आंब्यांचे आहे. यासोबत १० ते २० टक्के  क्षेत्र काजू, चिकू आणि फणसाच्या लागवडीखाली असल्याची माहिती मुरबाड कृषी अधिकारी दिलीप चोपडे यांनी दिली. प्रतिहेक्टर २ ते ४ टन आंब्यांचे उत्पन्न मिळते. कोणत्याही खते आणि रसायनांशिवाय हा आंबा पिकतो. शेतकरी गटांमार्फत या आंब्यांची खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे अनेकदा व्यापारी या आंब्यांची थेट बागेतून उचल करतात.