स्मार्ट सिटी प्रकल्पाचा निधी कोरोना आपत्तीसाठी वापरा- नारायण पवार

स्मार्ट सिटी प्रकल्पाचा निधी कोरोना आपत्तीसाठी वापरा- नारायण पवार



ठाणे


 कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण जग ढवळून गेले असून, अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. २५ लाखांहून अधिक ठाणेकरांच्या उत्तम आरोग्यासाठी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी निधीची अडचण भासणार आहे. त्यामुळे हा निधी उभारण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे चार वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. त्यामुळे त्यातूनच हा निधी उभा करण्याची मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.


सध्याच्या परिस्थितीत स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाला स्थगिती देऊन शिल्लक निधी कोरोना रोखण्यासाठी वर्ग करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. स्मार्टसिटी अंतर्गत २६० कोटी ८५ लाखांच्या कोपरी सॅटीसचे ४.१ टक्के काम पूर्ण, १९ कोटी ६३ लाखांच्या पदपथ सुधारणाचे ११.१ टक्के, २२ कोटी ८७ लाखांच्या कॉम्प्रेन्सिव्ह सिव्हरेज सिस्टिमचे ४.०५ टक्के, ४७ कोटी २६ लाखांच्या पाणीपुरवठा पुनर्रचनेचे ७.९४ टक्के, १२१ कोटींच्या पाण्याच्या स्मार्ट मिटरिंगचे ३८.५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर २०४ कोटी ५४ लाख रुपयांच्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटमधील मुंब्रा, नागला बंदर, वाघबीळ-कोलशेत, साकेत-कळवा-कोपरी येथील कामे ५ ते २७ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांचा कोट्यवधी रु पयांचा निधी शिल्लक आहे. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटमध्ये केवळ १७ ते १८ कोटी व कोपरी सॅटीसमध्ये सुमारे साडेचार कोटी रु पये कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील रखडलेल्या कामांना स्थगिती देऊन त्याचा निधी कोरोनावर उपाय योजना करण्यासाठी वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे.