डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांच्या त्रासात वाढ

डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांच्या त्रासात वाढ



ठाणे


कोपरीतील डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात कचरा कुजून त्यामुळे बाहेर पडणाऱ्या मिथेनसारख्या ज्वालाग्राही वायूसह कार्बन मोनाक्साईड, सल्फरडाय ऑक्साइड अमोनियासारख्या प्रदूषित वायूंमुळे नागरिकांचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. येथील दुर्गंधीमुळे स्थानिकांना पोटात मळमळ, चक्कर येणे अशा स्वरूपाचा त्रास जाणवतो आहे. ठाणे पूर्वेकडील नाखवा हायस्कूल, कोपरीगाव, ठाणेकरवाडी, चेंदणीकोळीवाडा, मीठबंदर रोड या ठिकाणी दुर्गंधीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. 


ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सर्वत्र भीतीचे वातावरण असतानाच आता मुलुंड हरिओम नगर येथील मुंबई महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सन १९६८पासून येथे मुंबई शहराचा कचरा आणून टाकला जात होता. मात्र गेल्या वर्षभरापासून कचरा टाकणे बंद आहे. सध्या येथे कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. हवेच्या झोतासह येणाऱ्या दुर्गंधीत अनेक प्रकारचे विषारी वायू तयार होऊन ते हवेत पसरत आहेत.


सुमारे ७५ हेक्टरच्या डम्पिंग ग्राऊंडवर इमारतीचे सहा मजले उंच कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. उन्हाचा पारा वाढत असून या दरम्यानच्या काळात कचऱ्याला आगी लागत आहेत. त्यातच कचऱ्याची विल्हेवाट लावताना कचऱ्याची दुर्गंधी परिसरात आल्याचा आरोप स्थानिक करतात. गेल्या वर्षभरापासून डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद आहे. सध्या या परिसराची देखभाल कंत्राटदाराकडे आहे. त्यातच करोनामुळे कामगार वर्ग येत नाही. त्यामुळे मोठी अडचण आहे. कचऱ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका घेत असते. मात्र दुर्गंधीचा त्रास होत असेल तर लवकरच कचऱ्यावर फवारणी करू, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.