आयुक्त आणि आरोग्य अधिकार्‍यांना कळवूनही आरोग्य सेवकांचा समस्या जैसे थे

आयुक्त आणि आरोग्य अधिकार्‍यांना कळवूनही आरोग्य सेवकांचा समस्या जैसे थे



ठाणे


कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक आरोग्यसेवक जीवावर उदार होऊन काम करीत आहे. मात्र, या जीवावर उदार होऊन काम करणार्‍या आरोग्य सेवकांना त्यांचा मेहनतानाच ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आलेले नाही. त्यामध्ये कार्डीयाक रुग्णवाहिका चालवणारे चालक आणि आशा स्वयंसेविकांचाही समावेश असल्याची बाब माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटील यांनी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे, पाटील यांनी पालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकार्‍यांना ही बाब कळवूनही सदर कर्मचार्‍यांना वेतन आणि मानधन देण्यात आलेले नाही. 


कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य सेवेत असलेले कर्मचारी रात्रीचा दिवस करुन आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये पालिकेच्या सेवेत असलेल्या कार्डीयाक रुग्णवाहिका चालकांचाही समावेश आहे. ठाणे पालिकेच्या सेवेते कार्डीया रुग्णवाहिका चालविणारे 26 चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही.तर, सुमारे 200 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यांना अवघे 1500 रुपयांचे मानधन देण्यात येते. मात्र, हे अनुदानही जानेवारी महिन्यापासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कुटुंबियांची उपासमार होत आहे. ही बाब आपण पालिका आयुक्तांना फोनद्वारे कळविण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, त्यांनी फोन न घेतल्याने मेसेज करुन चालक आणि आशा स्वयंसेवकांच्या रखडलेल्या वेतनाची माहिती दिली आहे. तसेच, मुख्य आरोग्य अधिकारी माळगावकर यांनाही ही बाब सांगितली आहे. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची दखलच घेतलेली नाही, असेही मिलींद पाटील यांनी सांगितले.