राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी विधानपरिषदेत

राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी विधानपरिषदेत



मुंबई,


विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार सत्तारूढ आघाडीच्या 5 व भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. नवव्या जागेसाठी चुरस होती. नववी जागा जिंकण्यासाठी आघाडी व भाजप या दोघांनाही बाहेरून चार मतं मिळवावी लागणार होती. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्याने शिवसेनेची धावपळ उडाली होती. परंतु अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विनंती व भविष्यातील वायद्यानंतर काँग्रेसने एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली आहे.


 भाजपाच्या चार उमेदवारांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा लढवणार आहे. काँग्रेसने एकच उमेदवार देणे अपेक्षित होते. दुपारी केवळ राजेश राठोड यांच्याच उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. परंतु रात्री उशिरा अचानक काँग्रेसने अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांची उमेदवारी जाहीर करून गोंधळ उडवून दिला होता. यामुळे शिवसेनेचे धाबे दणाणले होते. काँग्रेसने एकच उमेदवार उभा करावा यासाठी शिवसेना नेत्यांकडून आज सकाळपासूनच काँग्रेसची मनधरणी सुरू होती. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विनंती केली. अखेर सायंकाळी सह्याद्री शासकीय आथितिगृहात आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर थोरात यांनी आघाडी केवळ पाच जागा लढवणार असल्याची माहिती दिली व रात्री सुरु झालेल्या नाट्यावर पडदा पडला.